आंबा फळगळतीची कारणे कोणती | Amba falgalati chi karane |
आंबा झाडावर येणाऱ्या मोहरापैकी फक्त ५ ते ३० टक्के फुले ही द्विलिंगी असतात, तर उर्वरित ७० ते ९५ टक्के फुले नरलिंगी असतात. द्विलिंगी फुलांपैकी काही, म्हणजेच एकूण फुलांपैकी फक्त दोन ते तीन टक्के फुलांचे परागीकरण होऊन फळधारणा होते. बाकीची सर्व फुले, म्हणजेच मोहर गळून जातो, हे लक्षात घ्यावे. आंब्याला येणाऱ्या एकूण फुलांपैकी फक्त ०.४ ते ०.५ टक्का फळे जरी काढणीस मिळाली तरी हे चांगले उत्पादन मिळाले असे समजले जाते. त्यापेक्षा अधिक गळ झाल्यास मात्र अंतिम उत्पादनास फटका बसू शकतो.
या वर्षी वातावरणामुळे बहुतांश बागांमध्ये मोहर येण्यास उशिराच प्रारंभ झाला. त्यातही पॅक्लोब्युट्राझोल हे वाढ नियंत्रक दिलेल्या बागांमध्येही नेहमीपेक्षा आठ दहा दिवस उशिरा मोहर सुरू झाला. त्याच्या संरक्षणासाठी यापूर्वीच्या लेखात माहिती दिली होती. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी मोहर संरक्षण केले असेल. त्याचा फायदाही त्यांना बऱ्यापैकी झालेल्या फळसेटिंगमधून दिसत असेल.
अर्थात, अद्यापही काही शेतकऱ्यांनी बागांमध्ये सेटिंग बरीच कमी असल्याचे सांगितले. आंब्यामध्ये फळधारणा होण्यासाठी संयुक्त फुलेच महत्त्वाची असतात. जातिपरत्वे बदल असला तरी सामान्यतः आंबा झाडावर येणाऱ्या मोहरापैकी फक्त ५ ते ३० टक्के फुले ही द्विलिंगी असतात, तर उर्वरित ७० ते ९५ टक्के फुले नरलिंगी असतात.
द्विलिंगी फुलांपैकी काही, म्हणजेच एकूण फुलांपैकी फक्त दोन ते तीन टक्के फुलांचे परागीकरण होऊन फळधारणा होते. बाकीची सर्व फुले, म्हणजेच मोहर गळून जातो, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. आताही एकेका मोहर काडीवर दहा ते बारा बाजरीच्या आकाराची फळे बागेत दिसत असली तरी त्यांची नैसर्गिकरीत्या गळ होऊ शकते.
आंब्याला येणाऱ्या एकूण फुलांपैकी फक्त ०.४ ते ०.५ टक्का फळे जरी काढणीस मिळाली तरी हे चांगले उत्पादन मिळाले असे समजले जाते. त्यापेक्षा अधिक गळ झाल्यास मात्र अंतिम उत्पादनास फटका बसू शकतो.
●फळगळतीची कारणे
ऑक्झिन (Auxin) इफेक्ट
ऑक्झिन्स ही झाडांमध्येच तयार होणारी संप्रेरके आहेत. (यात आय.ए.ए , एन.ए.ए , टू फोर डी यांचा समावेश होतो.) विशेषतः फळधारणा झाल्यानंतर सुरुवातीला फक्त पेशी विभाजन होत असते. ते तीन आठवड्यांत पूर्ण होऊन पेशींची अपेक्षित संख्या निर्माण झाल्यानंतर फळाचा आकार वाढू लागतो. त्यानंतर काही दिवसांनी त्यात बी वाढण्यास सुरुवात होते.
या वेगवेगळ्या अवस्थेत फळामध्ये व फांदीमध्ये कमी अधिक प्रमाणात ऑक्झिन तयार होते. फांदीच्या तुलनेत फळात जास्त ऑक्झिन्स असले तर फळगळ होत नाही. फळात ऑक्झिन कमी पडल्यास त्याच्या देठाजवळ एक चीर पडते. तिला ॲब्सिशन लेअर असे म्हणतात. ही चीर पडली की फळगळ होते.
फळावर पडलेला सूर्यप्रकाश, तापमानात झालेली वाढ किंवा फळावर आलेला भुरी, तुडतुड्यांचा प्रादुर्भाव अशा कोणत्याही कारणामुळे फळातील ऑक्झिन नाश पावते. म्हणजे त्याचे प्रमाण कमी होऊन ही ॲब्सिशन लेअर तयार होते.
●आंबा जातीनुसार होणारी फळ गळ
आंब्याच्या ज्या जातीमध्ये देठ मजबूत असतो, त्याची कमी फळगळ होते. (उदा. दशेहरी आंबा), मात्र देठ कमकुवत असलेल्या जातीमध्ये फळगळतीचे प्रमाण अधिक असते. (उदा. लंगडा)
●खराब हवामान
दिवस आणि रात्रीच्या तापमानात, वातावरणातील आर्द्रतेमध्ये चढ-उतार झाल्यास आंबा फळाची गळ जास्त प्रमाणात होते. वादळी वातावरण, मोसमी पाऊस आणि धुके यामुळे कीड-रोगाचे प्रमाण वाढूनही फळगळतीचे प्रमाण वाढते. फळे लहान असतानाच फेब्रुवारी- मार्चमध्ये तापमान एकदम ३५ अंशांच्या वर गेल्यास लहान फळांमधील ऑक्झिन नाश पावते व फळगळ वाढते.
●किडींमुळे होणारी गळ
आंब्याच्या फूल व फळधारणेच्या अवस्थेमध्ये तुडतुडे, फुलकिडे व अन्य रस शोषक किडीचा प्रादुर्भाव झाल्याने फळगळ वाढू शकते. तुडतुड्यांच्या शरीरातून स्रवणाऱ्या मधासारख्या चिकट द्रवाचे डाग पाने व फळांवर पडूनही ती गळून पडतात.
●रोगांमुळे होणारी गळ
भुरी रोगासाठी ढगाळ वातावरण, धुके आणि २७ ते ३१ अंश सेल्सिअस तापमान या बाबी अनुकूल आहेत. भुरीचे पांढऱ्या रंगाचे आवरण तयार झाल्याने अविकसित मोहर आणि फळे गळून पडतात. या रोगामुळे ३० ते ९० टक्क्यांपर्यंत फळांचे नुकसान होते. करपा रोगामुळे फळाचा देठ आणि मोहर काळा होऊन सुकतो. या रोगामुळे लहान फळांची गळ मोठ्या प्रमाणात होते.
●पोषण कमतरतेमुळे होणारी गळ
शिफारशीप्रमाणे खतांचे योग्य प्रमाणात व योग्य अवस्थेत व्यवस्थापन केले नसल्यास पोषण अपुरे पडते. परिणामी फळगळ वाढते.
◆फळगळसाठी करावयाच्या उपाययोजना
●संजीवकाचा वापर
सेटिंग झाल्याबरोबर जिबरेलिक ॲसिड (जीए) ५० पीपीएम (म्हणजे एक ग्रॅम प्रति वीस लिटर पाणी) या प्रमाणे एक फवारणी घ्यावी. यानंतर युरिया दोन टक्के (म्हणजे २० ग्रॅम) आणि कार्बेन्डाझिम २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे एक फवारणी घेणे फायदेशीर राहते.
आंबा फळे बाजरी ते वाटाण्याच्या आकाराची झालेली असताना सामान्यतः वातावरणातील तापमान वाढण्यास सुरू होते. अशावेळी नॅप्थील ॲसेटिक ॲसिड (एनएए) २० पीपीएम (म्हणजे दोन ग्रॅम) अधिक युरिया दोन टक्के (म्हणजे २ किलोग्रॅम) अधिक कार्बेन्डाझिम १०० ग्रॅम प्रति १०० लिटर पाणी या प्रमाणे तापमानाच्या अंदाजानुसार बारा ते पंधरा दिवसाच्या अंतराने दोन ते तीन फवारण्या घ्याव्यात.
●पाट पाणी
फेब्रुवारी, मार्च महिन्यामध्ये बागेतील तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यास जमिनीच्या मगदुराप्रमाणे दोन ते तीन पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. ठिबक असले तरी पाटाने मोकळे पाणी दिल्यास बागेतील आर्द्रता वाढून तापमान कमी राहण्यास मदत होते. त्यामुळे तापमानाच्या ताणामुळे गळणारी लहान फळे झाडावर टिकून राहतात. साधारणतः लिंबाच्या आकाराच्या फळांमध्ये उन्हाचा चटका व जास्तीचे तापमान सहन करण्याइतपत ताकद आलेली असते.
●पोटॅशिअम नायट्रेट फवारणी
याच काळामध्ये बागेमध्ये पोटॅशिअम नायट्रेट १० ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे एक ते दोन फवारण्याचे नियोजन करावे. माती परीक्षणानंतर कमतरता असलेल्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापरही त्यासोबत करू शकता. बहुतांश काळ्या आणि भारी जमिनीमध्ये पिकाला जस्ताची कमतरता भासते. अशा जमिनीमध्ये झिंक सल्फेट पाच ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे वापर करू शकता.
●वारा प्रतिबंधक झाडांची लागवड
नवीन लागवड करणाऱ्या बागायतदारांनी फळाचे उन्हाच्या चटके व उष्ण वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी बागेभोवती वारा प्रतिबंधक झाडांची लागवड करून घ्यावी. केलेली नसल्यास वाराप्रतिबंधक म्हणून शेडनेट, गवताचे किंवा बांबूचे तट्टे याचा वापर करता येईल.
●आंतरमशागत
सध्या लहान फळे लहान असलेल्या स्थितीमध्ये बागेत आंतरमशागत करणे प्रकर्षाने टाळावे, अन्यथा मुळांना इजा होऊन गळ वाढू शकते.
●सिंचन
बागेमध्ये जमिनीच्या प्रकारानुसार बाग नेहमी वाफसा स्थितीमध्ये राहील, असे सिंचन व्यवस्थापन करावे.
रोग, कीड नियंत्रण
भुरी व करपा या रोगांच्या किंवा तुडतुडे, फुलकिडे या किडींच्या नियंत्रणासाठी शिफारशीत वेळापत्रकानुसार व प्रादुर्भावानुसार फवारणीचे नियोजन करावे.